शब्दानुभव

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे पाच पञ्चविषय आहेत जे आपण आपल्या पञ्चज्ञानेन्द्रियांनी भोगत असतो. ह्यांतिल प्रत्येकाचे आपल्या जीवनात एक स्वतंत्र स्थान तर आहेच आणि त्या प्रत्येक विषयाचे वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे. तसेच, प्रत्येक विषय हा या-ना-त्या कारणाने इतर विषयांशी संलग्न होतो. उदा. खाद्यपदार्थ चांगला की वाईट हे त्याच्या गंधावरुन ठरवलं जाते. परंतू सरासरी ह्या सर्वांची समीकरणं जुळवली असता ह्या सर्व विषयांत प्रामुख्य असणारा विषय ठरतो तो “शब्द”! कारण, वरील उदाहरणानुसार जसे सर्व विषय इतरांशी संलग्न होतात; आणि त्यानुसार बघितले असता, शब्द हा सर्वश्रेष्ठ, कारण त्याची संलग्नता थेट विचारांशी आहे. इतर ज्ञानेन्द्रियांच्या संवेदनांतून ज्ञान घेता येते परंतू त्यांची प्राथमिकता भोग भोगण्यासाठीच गणली जाते. मात्र काही विशेष स्तरांवर ज्ञानाशी संबंध आल्यास त्याचे स्वरुप भोग भोगण्याचे व्यर्थ कष्ट सोडून ज्ञानाधिष्ठित साधनेकड़े परावर्तित होते.

 

आता आपला आजचा विषय, “शब्द”. आता ह्याची महिमा आपण काय ‘शब्दांत’ व्यक्त करणार!? विचारांवर प्रभुत्व गाजवणारे हे शब्द! योग्य ठिकाणी वापरल्यास सोनं करणारे आणि अयोग्य पद्धतीने मारल्यास प्रलय आणणारे. शब्दांचा महिमा सर्व संत-महात्म्यांपासून ते मोठमोठ्या विचारवंत, तत्वज्ञांपर्यंत सर्वांनी गाऊन झाले. परंतू या शब्दाचं वरवर ढोबळमनाने निरिक्षण आणि चिंतन करुया म्हटलं.

हे चिंतन मराठीत असल्याने इतर भाषांना तेवढे प्रासंगिक ठरेल की नाही हे सांगू शकत नाही पण जेवढं थोडंफार इतर भाषांचं ज्ञान आहे त्यानुसार सर्व भारतीय भाषांना तरी हे लागु होईल असं वाटतेय.

 

शब्दांचं रूप जर आपण लक्षात घेतलं तर ते असं शब्दांत नाही मांडता येणार, कारण तो एक अनुभव आहे. नामरूप किंवा शब्दरुपाने आपले अस्तित्व गाजवते ती ही त्रिगुणातीत माया, म्हणजेच त्यायोगाने आकाराला आलेले हे जगत. या जगाचं ज्ञान होण्याकरीता, त्यांतील सर्व घटकांना दिलेले नाम म्हणून हे “नामरूपाने आकारवान असलेले जग” असे म्हटले जाते. म्हणजेच त्या जगाच्या ठिकाणी शब्द नाही तर शब्दांच्या ठिकाणी हे जग आहे म्हणजे ज्ञान आहे. जर ते शब्दांच्या सीमा ओलांडून गेले तर ते ज्ञानातुन ध्यानात परावर्तित होते. इथे शब्दाच्या व्याप्तिचा पूर्णविराम किंवा, आपल्या अल्पज्ञानी अनुभवामुळे, स्वल्पविराम म्हणुया. म्हणून शब्दांचं स्वरुप शब्दांत मांडता नाही येणार परंतु त्याच्या अनुभवावर काही प्रकाश टाकता येईल.

एखादा शब्द किंवा नाम उच्चारल्यावर ती वस्तूरूप असल्यास तिचं दृश्यस्वरुप आपल्या लक्षात येते. उदा. आंबा म्हटलं की केशरी, पिवळा वरून गोलाकार आणि खाली निमुळता होत वक्र होवून एक टोक असलेला ‘आंबा’ आपल्यासमोर येतो, तो प्रत्यक्षात तिथे नसताना सुद्धा. असं ते शब्दातून समोर येणारं रूप, म्हणून ह्या पञ्चमहाभूताने बनलेल्या जगाचे होणारे ज्ञान, म्हणजे नामरूप दर्शन. आता हा असा कुठलाही शब्द आपण जर मनात घोळत बसलो तर हळुहळु त्या वस्तुचे स्वरुप आपल्या स्मृतितुन नाहीसे होत जाते आणि त्या शब्दाचे तुकडे पडून आपल्याच मनात वरवर त्या शब्दाचे संधी-विग्रह व्हायला सुरुवात होते. (हा प्रयोग मी खुपदा करून बघितला आहे. लहानपणी सर्वांनीच केला असावा.)

आता हा अनुभव लक्षात घेता, त्या शब्दाद्वारे आकाराला आलेल्या भाषेचा विचार करता येईल. लहानपणी एखादा नविन शब्द ऐकल्यावर ते मूल त्यावर विचार करते, तो शब्द घोळत बसते आणि आपल्याच मनात त्याने आकाराला आलेल्या वस्तूची संकल्पना करण्यास सुरुवात करते. त्याचा अंदाज़ सहसा चुकतच असावा पण अश्यानेच त्या शब्दाच्या स्वरूपाचा अनूभव लक्षात येवू शकतो.

जसे सर्व विषय एकमेकांशी किंवा त्या त्या ज्ञानेन्द्रियांशी संलग्न आहेत तसेच शब्दाच्या बाबतीत बघुया, म्हणजे वाग्यंत्र – आपले तोंड, जीभ आणि गळा आणि श्वासावरील नियंत्रण यांच्या संयोगाने होते ते शब्दाचे उच्चारण आणि कर्णाने होते ते श्रवण. श्रवणाच्या अनुभवाशी आपण चांगलेच परिचित आहोत. इथे आपण शब्दोच्चारणाचा विचार करुया. ह्यांतुन त्या सर्व स्वरांचा ऐकण्याच्या आणि उच्चारणाच्या अनुभवाचे निरिक्षण करता येवू शकते. उदा. “दगड” हा शब्द उच्चारल्यावर आपल्या स्मरणात येतो तो कठोर काळा पदार्थ. समजा, की दगड म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही, तरीही “दगड” उच्चारल्यानंतर त्या शब्दातून कठोरपणाचा अनुभव येतो की नाही हे प्रमाणिकपणे विचार केल्यास कळेल. आणि नाही कळाला तर सारखेच निरिक्षण “फुल” या शब्दाचे करून बघा. कुठलेही फुल विचारात न आणता त्या शब्दातच तो कोमलपणा, ती निरागसता त्या उच्चारणात अनुभवाला येते.

10524714_10153118357437483_5976622711553061191_n

यानुसार बघितले असता, गायकाला हा उच्चारण अनुभव नक्कीच सुखदायक असावा. कारण गाताना त्या गायक किंवा गायिकाच्या मुखावरील मुद्रा आणि हावभाव तसेच त्यांचे तान घेतानाचे हातवारे करणेच हे सूचित करते. त्यातील ते सुख स्वरसाधना करणारा तो पट्टीचा गायकच जाणे!

 

ह्या शब्दोच्चाराविषयीचा प्रत्यय, हा अनुभव संतांशिवाय इतर कुणाला जास्त चांगल्याप्रकारे ठावुक असेल असे वाटत नाही. सदैव भगवन्नाम जपत असलेले; विठ्ठल-विठ्ठल, राम-कृष्ण-हरि सतत आजन्म उच्चारत जपाजप स्थितीत गेले संत. अहो तेच सांगतात शब्दांचा आणि भगवंताच्या नामाचा महिमा – तुकोबा म्हणतात, “आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।।”

शब्दाला शस्त्र म्हणतात, रत्नाची उपमा देतात आणि शब्दालाच जीवन म्हणून सर्वार्थाने आपल्या ‘स्व’ला त्यावर ओवाळून टाकतात.

भगवन्नामाच्या प्रत्येक उच्चारात तो अनुभव येतो. अहो “कृष्ण” म्हटलं की “कृ”चा रुकार म्हणजे श्रीकृष्णाने बासरी वाजवत उभे असताना दुमडलेले पाय असाच अनुभव होतो. “हरि” म्हणजे हरुन घेणारा, आपल्या सर्व वृत्ति-प्रवृत्तिंचे हरण करणारा. तसेच कृष्ण म्हणजे काळा. नकारात्मक शब्दाची पण किती ती सकारात्मक उर्जा! आणि “राम”, अहो तुम्ही अन्तःकरणपूर्वक नाम घ्या! अखंड विश्व त्या दोन अक्षरी शब्दात सामावल्यासारखे वाटते.

इतर शब्दांचा उच्चारण-श्रवण अनुभव ह्यांत परस्पर भेद आढळून येईलही, पण “राम-कृष्ण-हरि” ह्याचा अनुभव नित्य-निरंतर समान आनंद देणारा, म्हणून शाश्वत आहे. जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य कळवळा करून सांगतात, “हरेर्नामैव केवलम्…”

नामरुपाने आकाराला आलेल्या या जगतरूपी मायेला तरुन जाण्यासाठी एकमेव पर्याय हे नाम म्हणजे.. शब्दच!!

photo5

(Image Courtesy: My Indian Art Pics, MaharashtraTimes.com)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s